महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
संघटनेतील काही कार्यकर्त्यांच्या स्वार्थी वर्तनामुळे सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत असलेली नाराजी तसेच ‘साहेबांची’ प्रतिमा जपण्याचे आवाहन करणारा एक भावनिक संदेश सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान समाज माध्यमांमध्ये हा मेसेज टाकणाऱ्या व्यक्तीला संबंधितांनी ग्रुप मधून तात्काळ काढून टाकले.
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांचे म्हणणे नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची उभारणी करण्यात येते. मात्र, संघटनेतील काही मंडळी नेत्यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर केवळ वैयक्तिक स्वार्थ, दबावगट, कूटनीती आणि अंतर्गत कुरघोडीसाठी करत असल्याचे या संदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
तळागाळात नेमके काय सुरू आहे, याची वरिष्ठ नेतृत्वाने दखल घेतली नसली तरी या गैरप्रकारांमुळे सामान्य माणूस आणि मतदार अप्रत्यक्षपणे नेतृत्वावर तसेच संपूर्ण यंत्रणेवर नाराज होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात बांधकाम क्षेत्रातील एक व्यावहारिक उदाहरणही देण्यात आले आहे. एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने किंवा कंत्राटदाराने, जो स्वतःला कार्यकर्ता समजतो, कामगार किंवा गवंड्याची मजुरी बुडवली, तर पीडित कामगार तक्रार घेऊन नेतृत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. तो आपले हक्काचे पैसे सोडून देतो आणि संघटनेपासून अलिप्त होतो. वास्तविक या घटनेशी नेतृत्वाचा थेट संबंध नसला तरी कामगाराच्या मनातील नाराजी वाढत जाते. परिणामी, आगामी काळात संघटनेच्या विविध उपक्रमांच्या वेळी किंवा निवडणुकांच्या काळात इतर कार्यकर्ते अशा घटकांपर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांच्याकडून रोष आणि नाराजीचा सामना करावा लागतो, अशी वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.
संघटना, विचारधारा आणि नेतृत्वासाठी काम करत असताना कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करून सरळमार्गी राहावे, असे स्पष्ट आवाहन या संदेशातून केले आहे. विरोधकांशी लढायचे असेल तर नक्की लढावे; परंतु सर्वसामान्य आणि गरीब घटकांना वेठीस धरण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संघटनेत प्रवेश करण्यापूर्वी सर्व गोष्टींची माहिती वरिष्ठांना असते, असा समज होता; मात्र प्रत्यक्ष काम करताना तळागाळातील अनेक बाबींची नेतृत्वापर्यंत माहिती नसते, हे लक्षात आल्याचेही नमूद केले आहे.
कोणत्याही विषयावर वरिष्ठ नेतृत्व विरोधकांबद्दलही अपशब्द वापरत नाही आणि ‘सर्व आपलेच आहेत’ ही भूमिका घेते. या उदारतेचा गैरफायदा घेणे आता बंद केले पाहिजे, असा इशाराही देण्यात आला आहे. आपली ही सर्व मते वैयक्तिक असून या संदेशामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर लहान भाऊ समजून माफ करावे, अशी विनंती करत एका कार्यकर्त्याने आपली भूमिका मांडली आहे.
— नेमका सोशल मीडियावर व्हायरल झालेला संदेश काय आहे बघा..
माफ करा आपला थोडा वेळ घेतो आणि माझं एक वैयक्तिक मत मांडतो!
आपण सर्व साहेबाना सपोर्ट करतोय साहेबांनी आपल्याला कार्यकर्ते बनवले कशासाठी..? …सर्व सामान्य, शेतकरी गरिबांचे समस्या निरसन करणे किंवा त्यांचे मत साहेबापर्यंत पोहचवणे इत्यादी… पण काही लोकांनी साहेबांच्या फोटो/कनेक्शनचा वापर करून स्वतःची वैयक्तिक इमेज बनवली, ही लोक त्या इमेजचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी, बनवाबनवीसाठी, दबावतंत्रासाठी, कूटनीतीसाठी, वैयक्तिक राजकारणासाठी, अंतर्गत जिरवा-जिरवीसाठी करतात. आणि साहेबांना हे माहितीपण नसत. ग्राउंड लेव्हल खाली काय चालले. बनवाबनवी, दबावतंत्र, कूट नीती इत्यादी मुळे नाराज झालेले सामान्य वर्ग, शेतकरी वर्ग, मतदार राजा हा directly-indirectly साहेबांवर नाराज होतो, सिस्टीमवर नाराज होतो. उदाहरणार्थ एक कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आपल्या बांधकाम गवंड्याचा /बिगाऱ्याचा कामगाराची मजुरी वैयक्तिक फायद्यासाठी बुडवत असेल तर तो गवंडी त्याचा मालक कार्यकर्ता असल्यामुळे साहेबांपर्यंत येतच नाही, पोहचत नाही आणि तो पैसे सोडून देतो आणि थोड्या काळासाठी का होईना अथवा कायमस्वरूपी अलिप्त होतो. actually या गोष्टीचा आणि साहेबांचा काही संबंध नसतो पण तो नाराज होतो हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. मग पुढे जाऊन संघटनेच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असेल किंवा निवडणुका असेल दुसरे कार्यकर्ते या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर ही लोक आपल्याला बोलत नाही आणि काही लोक बोलतात तर आपल्याला ऐकवत नाही अशी अवस्था आहे. आपण सर्व एका संघटनेसाठी काम करतोय. एका विचारासाठी काम करतोय. साहेबांसाठी काम करतोय. याच भान असूद्या, भानावर या, सरळ मार्गी वागा. जिथे विरोधकांशी लढायचे तिथे नक्की लढा पण गरिबांना वेठीस धरण सोडून द्या. मी वैयक्तिक ज्यावेळेस संघटनेमध्ये नव्हतो त्यावेळेस मला पण असंच वाटायचं की साहेबांना सगळं माहिती आहे पण खरंच साहेबांना याची कल्पना नसते हे संघटनेत आल्यावर कळते समजते. चुकून हुकून एखादा विषय साहेबांपर्यंत पोहोचला तर साहेब, सर्व सगळ्यांना माहित आहे साहेब विरोधकांना सुद्धा वाईट बोलत नाही, कोणाला वाईट बोलत नाही. साहेबांचे एक वाक्य आहे सर्व आपलेच आहे. याचा फायदा घेणं बंद करा.
वरील सर्व मते माझे वैयक्तिक आहे कोणाला जर माझ्या मेसेजमुळे ठेस पोचली तर छोटा भाऊ समजून सोडून द्या.






