महाराष्ट्र संवाद न्यूज
ज्येष्ठ साहित्यिक, लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्यावतीने या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्यातील सहा, समाजकार्यातील चार आणि नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कारांचा यात समावेश आहे.
प्रा. रंगनाथ पठारे यांना दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला ‘साहित्य जीवन गौरव पुरस्कार’, राजन गवस यांना एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला ‘कथा आणि कादंबरीसाठी’, सोनाली नवांगुळ यांना एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्हाचा समावेश असलेला ‘विशेष पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय अनिल साबळे यांना पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला पिवळा पिवळा पाचोरा कथासंग्रहासाठी ‘ग्रंथ पुरस्कार’ भुरा आत्मकथनासाठी शरद बाविस्कर यांना पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला ‘ग्रंथ पुरस्कार’, ‘पुनश्च हनिमून’ या नाट्य लेखनासाठी पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला रा. श. दातार पुरस्कार संदेश कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.
यासोबतच एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क यांना, एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला समाजकार्य विशेष पुरस्कार अनुक्रमे शांताराम पंदेरे (दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेले कार्य), आणि प्रमोद झिंजाडे यांना (विधवा प्रथा निर्मूलनाचे कार्य केल्याबद्दल), पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला समाजकार्य पुरस्कार अनुक्रमे कुमारीबाई जनकातन (कार्यकर्ता संघर्ष) आणि नंदिनी जाधव (कार्यकर्ता प्रबोधन) यासाठी यांना जाहीर झाला आहे.
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. साधना ट्रस्टचे विनोद शिरसाठ, मुकुंद टाकसाळे (साहित्य पुरस्कार समन्वयक) आणि डॉ. मनीषा गुप्ते (मासूम) यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. 
यावर्षीचा पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यामध्ये ‘मासूम’ संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी २०२३ रोजी टिळक स्मारक मंदीर येथे होणार आहे.

