महाराष्ट्र संवाद न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात ग्रामदेवी पोलीस ठाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी शरद पवार यांना हा फोन आल्याचे समजते. फोनवरील अज्ञात व्यक्तीने त्यांना मुंबईतून देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे या वर्षात अशा प्रकारचा फोन त्यांना दुसऱ्यांदा आला असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९४, ५०६ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार यांना यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा धमकीचा फोन
याआधी १९ सप्टेंबर २०२२ रोजी शरद पवार यांना धमकीचा फोन आला होता. शरद पवार सोलापूरच्या कुर्डूवाडीत नियोजित दौऱ्याला जाण्यापूर्वी हा फोन आला होता. आपण कोणत्याही परिस्थितीत दौऱ्यावर जाऊ नका, कुर्डूवाडी दौरा टाळा, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना फोनवर दिली होती. मात्र या धमकीला न जुमानता त्यांनी आपला नियोजित दौरा पूर्ण केला होता.

