महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक : एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्टीन चालकाच्या हलगर्जीपणामुळे एमबीबीएस शाखेत शिकणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. बाधित विद्यार्थ्यांवर एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. नामांकित महाविद्यालयात विषबाधेची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथे असलेल्या नामांकित एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली. महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये बुधवारी (दि.२८) रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. एकूण दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. महाविद्यालयात असलेल्या कॅन्टीनच्या चालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराला एसएमबीटीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
असाच काहीसा प्रकार काही महिण्यापूर्वी इगतपुरी तालुक्यातील एका आश्रम शाळेत घडला होता. तेथेदेखील अश्या पद्धतीने जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पोषण आहारातून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्यातील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली होती तर दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला होता. 
त्या पाठोपाठ आता थेट राज्यात नामांकित असलेल्या शिक्षण संस्थेच्या आणि तेही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

