महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असून यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. या निमित्ताने अमृत उद्योग समूहाच्यावतीने गुरुवारी (१२ जानेवारी) सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिरातील प्रांगणाजवळ प्रेरणास्थळ येथे अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण केली. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारात राबवून संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरणारे संगमनेर हे आदर्श सहकाराचे मॉडेल निर्माण केले आहे. दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. दरवर्षी जयंती महोत्सव व प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब स्मृती पुरस्कार देऊन राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येते. याच बरोबर दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार वितरण कार्यक्रम येत्या काही दिवसात होणार आहे.
यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, उद्योगपती राजेश मालपाणी यांच्यासह अमृत उद्योग समूहासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या अभिवादन कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी विकास मंडळ व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.

