महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नेवासा : साहेब, वरखेड गावात खून झालाय. ११२ नंबरवर आलेल्या या गंभीर प्रकाराची दखल पोलीस यंत्रणेने लगेचच घेतली. आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. मात्र कोणाचाही खून झालेला नसून आपल्याला मिळालेली माहिती चुकीचे असल्याची पथकाची खात्री पटली. आणि चुकीचा फोन करणारा थेट तुरुंगात पोहोचला.
प्रजासत्ताक दिनाची धामधूम सुरू असताना सकाळीच नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर ७ वाजून ४९ मिनिटांनी फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने नेवासा तालुक्यातील वरखेड गावामध्ये खून झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली. खुनाचा गंभीर प्रकार असल्याने तातडीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलीस उपनिरीक्षक मोंढे, पोलीस नाईक संजय माने, अशोक कुदळे यांना घटनास्थळी पाठवले.
पोलीस पथक वरखेड या गावी गेल्यानंतर तेथे अशा प्रकारचे कोणतीच घटना घडली नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीची अधिक माहिती घेतली असता तुकाराम बाबुराव गोरे या व्यक्तीने फोन केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस पथक गोरे याच्या घरी गेले. तेथेही खुनासारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आल्याने पोलीस पथकाने गोरे याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तो दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांना आढळले.
त्याने नियंत्रण कक्षाला ११२ क्रमांकावर फोन केला का? अशी विचारणा केली असता त्याने कॉल करून खोटी माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गोरे याला ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे आणि त्याने खोटा फोन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नेवासे पोलीस ठाण्यात खोटी माहिती देणाऱ्या तुकाराम गोरे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या खोट्या फोनमुळे ऐन प्रजासत्ताक दिनी पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती.
साहेब गावात खून झालाय, दारूच्या नशेत ११२ नंबरवर फोन केला आणि पोहोचला जेलमध्ये… नेमके काय घडले
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घटना

