महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अपघातामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर मोटार अपघातामध्ये वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस नाईक संतोष चंद्रकांत काकडे लाचेच्या सापळ्यात अडकला आहे.
संतोष काकडे हा जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक असून काही दिवसांपूर्वी तक्रारदाराच्या वडिलांच्या अपघातातील मोटार वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने आरोपी लोकसेवक काकडे यांच्या विरोधात नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची तपासणी केली असता आरोपी काकडे याने १३ जानेवारीला लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर मंगळवारी (ता.३१) काकडे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी दिली आहे.
तक्रारदाराने यासंदर्भात नाशिकच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क केला होता. लाच लुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घार्गे-वालावरकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, चंद्रशेखर मोरे, मनोज पाटील, विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वीस हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाविरोधात लाचलुचपत विभागाने केला गुन्हा दाखल
शेवगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने 'या'साठी मागितली लाच

