महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
काँग्रेसचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्येचे ट्विटरवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या संदर्भात थोरात यांनीच आपल्या ट्विटर अकाउंट वरून या संदर्भात माहिती दिली असून पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे म्हटले आहे.
थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने ट्विटरवर हे खोटे (फेक) अकाउंट तयार केले आहे. या फेक अकाउंट वरून नियमितपणे ट्विट देखील केले जात होते. त्यामुळे काँग्रेस नेते बंटी पाटलांसह अनेकांनी हे ट्विट अकाउंट फॉलो केले आहे.
ट्विटर वरील हे बनावट खाते तयार करताना आरोपींनी थोरात यांच्या कन्या शरय देशमुख यांच्या फोटोचा वापर केला असून डीपीवर शरयू देशमुख यांचा व्यक्तिगत तर कव्हर फोटो म्हणून थोरात यांच्या कुटुंबाचा फोटो वापरण्यात आला होता. थोरात यांनी केलेल्या तक्रारीनंतर ट्विटर वरील हे खातं बंद झालं असल्याचं दिसते. तसंच हे खातं अस्तित्वात नसल्याचे नोटिफिकेशन दाखवलं जात आहे.
या संदर्भात थोरात यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ट्विट मध्ये बाळासाहेब थोरात म्हणाले “माझी कन्या शरयू देशमुख यांच्या नावे सुरू असलेले @SharayuDeshmukh हे ट्विटर अकाउंट खोटे (Fake) आहे. त्या संदर्भात पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आलेली आहे. कृपया याची नोंद घ्यावी. ट्विटर इंडिया आणि महाराष्ट्र सायबर यांनी दखल घ्यावी”
माझी कन्या शरयू देशमुख यांच्या नावे सुरू असलेले @SharayuDeshm हे ट्विटर अकाउंट खोटे (Fake) आहे. त्या संदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे. कृपया याची नोंद घ्यावी.@TwitterIndia @MahaCyber1 यांनी दखल घ्यावी. pic.twitter.com/HIs9AmJt1Y
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 6, 2023

