महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नासिक-पुणे महामार्गावर बोटा गावच्या शिवारामध्ये अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला आहे.
मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या नाशिक-पुणे महामार्गावर सोमवारी (ता. ६ फेब्रुवारी) रात्रीच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बोटा गावाच्या शिवारामध्ये असलेल्या विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात भक्षाच्या शोधात महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने या तरसाला जोराची धडक दिली. जोराची धडक बसल्याने तरसाचा जागीच मृत्यू झाला. मादी जातीचा दोन वर्ष वयाचा हा तरस असल्याची माहिती मिळाली.
घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांनी यासंदर्भात वनविभागाचे रामदास थेटे यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी ज्ञानदेव कोरडे, बाळासाहेब वैराळ दीपक वायाळ आदी कर्मचाऱ्यांनी या मृत मादी तरसाला ताब्यात घेत कोठे गावच्या रोपवाटिकेमध्ये नेले.
तेथे या तरसावर पुढील सोपस्कार पार पाडण्यात आले. आत्तापर्यंत पुणे नाशिक महामार्गावर अनेक वन्यजीवांचे बळी गेले असून यासंदर्भात वन्य प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी वनविभागाने पाऊले टाकण्याची गरज व्यक्त होत आहे.

