महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी चोरी करताना शिक्षिकेला मारहाण करत सोन्याचे दागिने आणि रोकड रकमेसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत पोबारा केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील बोटा गावामध्ये समोर आला आहे. याशिवाय चोरट्यांनी आजूबाजूच्या तीन-चार घरांमध्ये देखील चोरीचा प्रयत्न केला.
संगमनेर शहर व तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. चोरटे, गुन्हेगारांनी तालुक्यात उच्छाद मांडला असून गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक संपला असून त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमके काय करते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मंगलबाई पांडुरंग फटांगरे असे मारहाण झालेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या विद्यानगर (बोटा) येथे राहतात. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे त्या आपल्या खोलीमध्ये आणि त्यांचा मुलगा प्रथमेश हा आतल्या खोलीमध्ये झोपलेला होता. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाज्याची आतील कडी कशाने तरी उघडून आत प्रवेश केला.
उचकापाचक करत कपाटातील सोळा हजाराची रोकड चोरट्यांनी काढून घेतली. त्याच दरम्यान आवाजामुळे फटांगरे झोपेतून जाग्या झाल्या. चोरट्यांनी त्यांना दरडावत २५ हजार रूपये किंमतीचे दिड तोळे सोन्याचे मणीमंगळसूत्र, २५ हजार रूपयांचे दिड तोळे सोन्याचे मिनी गंठण, १० हजारांची तीन ग्रॅम सोन्याची अंगठी फटांगरे यांच्याकडून हिसकावून घेतली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे भेदरलेल्या शिक्षिका फटांगरे यांनी आरडाओरडा केला.
फटांगरे आरडाओरडा करू लागल्याने चोरट्याने लोखंडी रॉड त्यांच्या पाठीत मारत त्यांना जखमी केले. आवाज ऐकून त्यांचा मुलगा प्रथमेश झोपेतून जागा झाला व पळत पळत आपल्या आईच्या खोलीत आला असता त्याला पाहून चोरट्यांनी तेथून पलायन केले. या घटनेत रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल या दोघा अज्ञात चोरट्यांनी लांबविला आहे. तसेच परिसरात आणखी तीन-चार घरांमध्ये चोऱ्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळते.
चोरट्यांनी माळवाडी येथील विठ्ठल औटी यांच्या घराच्या खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला. आवाजामुळे औटी जागे झाल्याने चोरटे पळून गेले. बोटा गावांमध्ये योगेश शेळके यांच्या दुकानाचे कुलपे तोडण्यात आले. याशिवाय आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला मात्र हे सर्वजण जागे झाल्याने चोरट्यांना तेथून पलायन करावे लागले. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घारगाव पोलीस ठाण्यात प्रथमेश पांडुरंग फटांगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघा चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरीचा हा प्रकार समजतात पोलीस निरीक्षक संतोष खेडकर व हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. अधिक तपास पोलीस करत आहेत.

