महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात येणारा मेधा महोत्सव विश्वास पाटील, कृष्णप्रकाश, प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदेसह सिने कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे. महाविद्यालयीन वर्तुळात राज्यात नावाजलेल्या हा मेधा महोत्सव गुरुवारी (23 फेब्रुवारी) सुरू होत असून त्याचा समारोप शनिवारी (25 फेब्रुवारी) होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांनी दिली.
अधिक माहिती देताना देशमुख म्हणाल्या, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून मागील सहा वर्षापासून अमृतवाहिनीत मेधा महोत्सव होत असतो. यामध्ये डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिने अभिनेता विवेक ओबेराय, सिने अभिनेत्री मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, शेखर सुमन, अध्ययन सुमन, हास्य सम्राट भाऊ कदम, कुशल बद्रिके यांच्यासह विविध कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
यावर्षी अमृतवाहिनीतील मेधा मैदानावर गुरुवारी (23 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता पानिपतकार विश्वास पाटील व आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश, संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. शरयू देशमुख, इंद्रजीत थोरात, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत मेधा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कॉमेडियन मंगेश काकड हे उपस्थित राहणार आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता मार्गदर्शनासाठी आयएएस अधिकारी राजेश पाटील व युवा प्रबोधनकार गणेश शिंदे उपस्थित राहणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व श्रेयस तळपदे उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी (25 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता ट्रेनर रत्नाकर अहिरे उपस्थित राहणार असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री कृतिका गायकवाड, नितीन उगलमुगले व संतोष वावरे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मिमिक्री, डान्स, ग्रुप डान्स, गायन, वादन, ड्रामा, पेंटिंग, व्याख्याने याशिवाय विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हा मेधा महोत्सव विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजन केला असून या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मनोज शिरभाते, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. बी. एम. लोंढे, एस. टी. देशमुख, शितल गायकवाड, जे. बी. सेट्टी, अंजली कन्नवार, प्रा. विलास शिंदे यांचं विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.

