महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यात अडवून वाहन चालकांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या टोळीला पकडण्यास अकोले पोलिसांना यश आले असून पकडलेले सर्व आरोपी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे असल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते, लखन डेरासिंग माचरेकर, प्रेम विजय वाल्हेकर, प्रशांत मंगलदास गिर्हे (सर्व रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या लुटमार करण्याऱ्या टोळीतील आरोपींची नांवे आहेत. यातील अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल आहेत.
१६ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समशेरपुर येथून ठाणगांवकडे जाणाऱ्या वाहनाला चौघा जणांच्या टोळीने अडवत मारहाण करण्याची व रोकड रक्कम, मोबाईल घेऊन मोटारसायकलवर पळ काढल्याची घटना घडली होती. अकोले पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता त्यांना काही संशयित लोक मुथाळणे गावच्या परिसरात डोंगरामध्ये लपलेले असल्याची माहिती मिळाली होती.
आरोपीच्या मागावर असलेल्या पोलीस पथकाला आरोपींनी तेथील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत बराच वेळ झुंजविले, मात्र चौघांपैकी तिघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. तर एकाने तेथून पळ काढला होता. मात्र पोलिसांनी काही वेळातच चौथ्या आरोपीलाही पकडण्यास यश मिळविले. आरोपींकडून पोलिसांनी २ लाख ३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुषण हंडोरे, पोलीस नाईक अजित घुले, दीपक बडे, विठ्ठल शेरमाळे, अविनाश गोडगे, सुयोग भारती, आनंद मैड आत्माराम पवार, संदीप भोसले आदींनी ही कारवाई केली असून उपनिरीक्षक भुषण हंडोरे पुढील तपास करत आहेत.

