महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे येथे झालेल्या नवव्या राजस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धेत संगमनेरच्या गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या विद्यार्थ्यांनी ७ सुवर्ण आणि ५ रौप्य अशा १२ पदकांची कमाई केली आहे. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर उपविजेतेपदही पटकाविले आहे.
सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
२१ वर्षांखालील मुलींच्या शास्त्रीय नृत्य प्रकारात ‘दशावतार’ हे शास्त्रीय नृत्य सादर करून संस्कार बालभवनच्या समूहाने सुवर्णपदक मिळविले. या समुहात मिताली भडांगे, आदिश्री झंवर, रिया साकी, मनसा कालडा, आर्या भालेराव, भक्ती रत्नपारखी व अनुष्का जाधव यांचा समावेश होता. याच वयोगटातील मुलींच्या शास्त्रीय लोकनृत्य प्रकारात ‘झूम झूम’ हे लोकनृत्य सादर करतांना बालभवनच्या समुहाने रौप्यपदक मिळविले. या समुहात रिया साकी, मनसा कालडा, आर्या भालेराव, भक्ती रत्नपारखी, अनुष्का जाधव यांचा समावेश होता.
संस्कार बालभवनच्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण स्पर्धेत सात सुवर्ण आणि पाच रौप्य अशी एकूण बारा पदके मिळविल्याने बालभवनला उपविजेते घोषित करण्यात आले. या यशाबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी, नृत्य प्रशिक्षिका सोनाली मोहपात्रा यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

