महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर:
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये असलेल्या मढी येथील यात्रेत गाढवाच्या बाजारामध्ये पंजाबी संकरित तीन गाढवांपैकी एक गाढव तब्बल एक लाख रुपयाला विकले गेले आहे. त्यामुळे यात्रेतील हे गाढव लाख मोलाचे ठरलं.
याशिवाय या यात्रेमधील गाढवाच्या बाजारात काठेवाडी गाढवांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून आले. काठेवाड गुजरात येथून बाजारासाठी पायी येत असलेल्या तीनशे पैकी एकशे तीस गाढवांची रस्त्यातच विक्री झाली. त्यामुळे मढीच्या बाजारात पोहोचेपर्यंत अवघी 170 गाढवेच शिल्लक राहिली होती.
मढीची गाढवांची यात्रा देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेत भरणाऱ्या बाजारामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात.
पाथर्डी तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर मढी येथे कानिफनाथ देवस्थान आहे. कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला लावल्यानंतर आणि गोपाळ समाजाची मानाची होळी पेटल्यानंतर मढीच्या यात्रेला सुरुवात होत असते. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरत असते. होळीला सुरू झालेले ही यात्रा पाडव्यापर्यंत म्हणजेच तब्बल पंधरा दिवस चालते.
पंधरा दिवसांच्या या यात्रेमध्ये शेकडो वर्षापासून गाढवांचा बाजार भरतो. गाढवांच्या बाजारातील हा सर्वात मोठा बाजार असल्याने शेजारच्या राज्यातून गाढवाचे व्यापारी आपली गाढवे विकायला घेऊन येतात. गावरान गाढव, काठेवाडी गाढव आदी प्रकारच्या गाढवांचा यात भरणा असतो. साधारणता तीन हजार रुपयांपासून पुढे गाढवे विकली जातात.
भटक्यांची पंढरी म्हणून मढीच्या यात्रेला ओळखले जाते. राज्यभरातून लाखो लोक या यात्रेसाठी हजेरी लावत असतात. कानिफनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यात भटक्या विमुक्तांसाठी काम केल्याने, यात्रेच्या कालावधीमध्ये भटक्या समाजातील लोक मढीत मोठी गर्दी करत असतात.

