अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
अवघ्या सोळा वर्षाच्या बालिकेसोबत बालविवाह करणाऱ्या नवरोबासह त्याचे आई-वडील आणि सासूवर संगमनेरच्या तालुका पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात कनोली गावचे ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे (वय 38 वर्षे, रा. हनुमंतगाव, ता. राहता जि. अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात कनोली येथील नवरदेव त्याचे आई-वडील आणि त्याच्या सासू विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन मे 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कनोली येथे आरोपींच्या घरी बालविवाहाचा प्रकार समोर आला. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक शिंदे यांनी आरोपींच्या घरी जात अल्पवयीन नवरीच्या जन्मतारखेचा दाखला वरील आणि आधार कार्ड वरील तारखेची तपासणी केली असता नवऱ्या मुलीचे वय 15 वर्षे 8 महिने 14 दिवस असे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलीचे वय कायद्याने लग्न होण्याइतपत पुरेसे झालेले नसल्याने ग्रामसेवक शिंदे यांनी या मुलीचा पती सासू-सासरे आणि तिच्या आई विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
संगमनेर तालुका पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी या चारही आरोपींविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2007 चे कलम 9, 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप हे करीत आहे.

