संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
घरीच झालेल्या प्रसूतीनंतर पोट दुखत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली. तिची शरीरयष्टी बघता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांकडे रुग्णाच्या आधार कार्डची मागणी केली आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाची घटना पोलीस ठाण्यात पोहोचली असतानाच त्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे. यामुळे संगमनेरमध्ये बालविवाहाचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
दुसऱ्या घटनेतील पीडित बालिका संगमनेर तालुक्यातील असून तिचे सासर देखील संगमनेर तालुक्यातच आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पालिकेच्या तक्रारीवरून तिचा नवरा सासू-सासरे आणि आई-वडिल आशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी, लग्नानंतर झालेल्या गर्भधारणेतून मुलीची प्रसूती घरी करण्यात आली. त्यानंतर या मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तिला उपचारासाठी घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तपासणी दरम्यान ही मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आल्याने त्यांनी मुलीच्या नातेवाईकाकडून तिच्या वयाची माहिती घेत ती अल्पवयीन असल्याची खात्री करून या संदर्भात तालुका पोलिसांना माहिती कळविली होती.
संगमनेर तालुका पोलिसांचे पथक रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी या मुलीला विश्वासात घेत माहिती घेतली असता ती अल्पवयीन असल्याचे तसेच वयाच्या 17 व्या वर्षी तिची प्रसूती झाल्याने कायद्याने लग्नाचे वय झालेले नसताना देखील तिचे लग्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिचा नवरा सासू-सासरे आणि आई-वडिलांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक देविदास ढ़ुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड तपास करीत आहेत.

