सातारा (महाराष्ट्र संवाद न्यूज)
पुणेकर असलेल्या आणि साताऱ्यामध्ये दुय्यम निबंधक (वर्ग 2) पदावर कार्यरत असलेल्या उदय धनाजी सूर्यवंशी (वय 42) याने नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना एसीबीने सूर्यवंशी याला बुधवारी रंगेहात पकडले.
सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडे नोटीस ऑफ इंटीमेशनची पाच प्रकरणे मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी एसीबीने याबाबत पडताळणी केली असता सूर्यवंशी याने लाच मागितली असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर आज बुधवारी (10 मे) लाचखोर सूर्यवंशी याला पकडण्यासाठी सापळा रचला. तक्रारदाराकडून सातारा येथे सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग 2) यास एक हजार पाचशे रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक उज्वल वैद्य, पोलीस नाईक प्रशांत नलावडे, पोलीस शिपाई तुषार भोसले या सापळा पथकाने पकडले. त्यानंतर त्याच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसीबीच्या अधिका-यांनी सांगितले.

