(महाराष्ट्र संवाद न्यूज)
राहत्या घराचे कुलूप तोडत घरामध्ये घुसलेल्या अज्ञात चोरट्याने तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील निमोण येथे घडला. विशेष म्हणजे चोरट्याने चांदीचे देवही चोरून नेले आहे.
शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी विकास हरिभाऊ मंडलिक (वय 38 वर्ष रा. निमोन, ता. संगमनेर) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश मिळविला. चोरट्याने घरातील 29 हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेले.
चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये कानातील वेल, कानातले, पोत, चांदीचे 12 कॉइन व चांदीचे 2 देव, 1 शिक्का, दोन-तीन हजार रुपये चिल्लर व शेजारील खोलीतील फिर्यादीच्या आईच्या पेटीतील पैशाचा (नक्की आकडा सांगता येत नाही) समावेश आहे.
फिर्यादी विकास मंडलिक यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार आर. ए. पठाण पुढील तपास करत आहे.

