संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
सामायिक विहिरीवरील पिण्याच्या पाण्याचा कॉक फिरविण्याचा कारणावरून ४३ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण करण्यात आली. लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादीचा डावा पाय घोट्यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि फिर्यादी एकाच कुटुंबातील असून त्यांच्यातील वादाची परिणती थेट हाणामारीत झाली. संजय बाळासाहेब नेहे (वय 43 वर्ष, धंदा शेती व ड्रायव्हर रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे. तर राजेंद्र बाळासाहेब नेहे, सौरभ बाळासाहेब नेहे, पुष्पा राजेंद्र नेहे, मनीषा रावसाहेब नेहे (सर्व रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सावरगाव तळ येथे सामायिक विहिरीवरील पिण्याच्या पाण्याचा कॉक संजय बाळासाहेब नेहे यांनी फिरविल्याच्या कारणातून आरोपींनी त्यांना शिवीगाळ दमदाटी करत लाथा बुक्क्याने मारहाण केली मारहाणीमध्ये त्यांना बांधावरून खाली ढकलून दिले. तसेच तू यापुढे जर वेळेवर आला तर तुला आणि तुझ्या पत्नीला जिवंत सोडणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली मारहाणी मध्ये ढकलून दिल्याने संजय नेहे यांच्या डाव्या पायाच्या घोट्यामध्ये फ्रॅक्चर झाले.
अशा आशयाच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी आरोपीं विरोधात सोमवारी संध्याकाळी भारतीय दंड संहिता कलम 325, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस एस पाटोळे करत आहे.

