संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
दुचाकी वरून जाणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिच्या दुचाकीला कट मारून ‘तू मला आवडतेस’, असे म्हणून लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जमजम कॉलनी येथे राहणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून याच भागातील फरदीन शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या मुलीने म्हटले आहे की, सोमवारी (ता. 22 मे) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या ओळखीच्या एका दाम्पत्यासह दुचाकीवरून रहेमतनगर येथे नाश्ता करण्यासाठी जात असताना पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून पाठलाग करीत आलेल्या आरोपी फरदीन शेख याने तिच्या दुचाकीला कट मारत थांबून तू मला फार आवडतेस, असे म्हणत तिला लज्जा उत्पन्न होईल असे लज्जास्पद वर्तन केले.
त्यामुळे तिने आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या आरोपीने तेथून पळ काढला. पीडित मुलीने घरी गेल्यावर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर मंगळवारी (ता. 23 मे) दुपारी पीडित मुलगी आणि तिच्या आईने शहर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
पीडित मुलीच्या तक्रारीची तात्काळ दाखल घेत पोलिसांनी आरोपी फरदीन शेख (रा. जमजम कॉलनी, गल्ली नंबर 5, संगमनेर) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

