संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
संगमनेर शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी पकडून देखील त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. एकाच वेळी शहरात दुचाकी चोरट्यांच्या एकापेक्षा अधिक टोळ्या कार्यरत असल्याचे दुचाकी चोरीच्या घटनांमधून समोर येत आहे. शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अज्ञात चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकीमध्ये एका बुलेटचा समावेश आहे.
19-20 मे दरम्यान शहरातील ताजणे मळा येथून हबीब अब्दुल करीम तांबोळी या किराणा व्यावसायिकाची सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची क्लासिक कंपनीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. या संदर्भात बुधवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये मंगळवारी रात्री आठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तीन पत्ती चौकातील मसल मॅजिक जिम येथून अमान फारुक बेपारी या व्यापाऱ्याची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल चोरून नेली. दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस दुचाकी चोरांचा शोध घेत आहे.

