महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांनी मोठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी पकडली असून यात 1 कोटी 28 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्यासह लाखो रुपये किमतीची दोन वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहे.
नासिकहून मुंबईच्या दिशेने दोन वाहनांमधून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इगतपुरी जवळील ग्रँड परिवार हॉटेल समोर वाहन पकडण्यासाठी सापळा लावला होता. पोलीस पथकाने संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यांना दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी वाहन चालक सलमान अमीनखान (वय 32 वर्ष) व इरफान आमिरखान (वय 31 वर्ष, रा. हरियाणा) यांना ताब्यात घेत अटक केली. पकडलेल्या दोन्ही वाहनांमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला यात 178 गोण्यांमधून गुटख्याची वाहतूक केली जात होती. 1 कोटी 28 लाख रुपये किमतीचा हा साठा जप्त करण्यात आला असून इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमाखाली तसेच अन्नसुरक्षा मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, सचिन देसले, मुकेश महिरे, ढोकरे, खराटे, बागुल, अहिरे, रुद्रे, पोतिंदे आदींचा समावेश होता.

