महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर :- पुण्याहून संगमनेरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा संगमनेर शहर पोलिसांनी पकडला आहे. दोन किलो गांजा सह पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणलेली आलिशान टाटा कंपनीची नेक्सन कार आणि विवो कंपनीचा मोबाईल असा 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रोडने जाणाऱ्या एका संशयित वाहनचालकाला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाहन वेगात घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला कोल्हेवाडी रस्त्यावरील चर्चजवळ पकडले. वाहनाचे झडती घेतली असता वाहनाच्या डिक्की मध्ये गांजा असल्याचा संशय आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने वरिष्ठांना दिली. व वाहन चालकाला ताब्यात घेतले.
त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्यासह पथकाने संशयित वाहनाचे तपासणी केली. तसेच वाहनचालकाने पोलिसांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याचे वर्तन संशयास्पद वाटले. तपासणी मध्ये पोलिसांना खाकी रंगाच्या प्लास्टिक सेलो टेपने गुंडाळलेले एक पाकीट आढळून आले यामध्ये 2 किलो 110 ग्रॅम वजनाचे काळपट हिरवट रंगाची पाने फुले काड्या असलेले त्यांना कॅनाबीस वनस्पतीचे शेंडे (उग्र वासाचा गांजा) आढळून आला.
कारवाई मध्ये पोलिसांनी सुमारे अठरा हजार रुपये किमतीचा गांजा चार लाख रुपये किमतीची नेक्सन कार व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण चार लाख 28 हजार ताब्यात घेतला. विक्रीच्या उद्देशाने आणलेला हा गांजा आरोपीने कोणाकडून घेतला होता? संगमनेरात कोणाला विकला जाणार होता? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी संदीप विष्णू पालांडे (वय 39 वर्ष, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर, पुणे 5) याच्याकडून समाधानकारक माहिती मिळू शकली नाही.
शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रामकिशन मुन्नय्या मुकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप विष्णू पालांडे याच्या विरोधात अमली औषधी द्रव्य व मनः प्रभावी पदार्थ विधी निषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 8 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे.

