महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर: संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी निघणाऱ्या भव्य मोर्चाला प्रशासनाने अटी शर्तींवर अखेरच्या क्षणी परवानगी दिली आहे. त्यामुळे मोर्चाचा परवानगीचा अडथळा दूर झाला आहे. मोर्चातील नागरिकांचा मोठा अभूतपूर्व सहभागाचे शक्यता लक्षात घेता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. पोलीस प्रशासनाने मोठ्या लवाजम्यात मिरवणूक मार्गावरून रूट मार्च काढला होता.
महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीमध्ये साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या, शहर व तालुक्यात होणारी गोवंश कत्तल लव्ह जिहादसारख्या घटना किरकोळ वादातून ग्रामीण भागातील शेतकरी मजूर शालेय विद्यार्थी युवक यांना होणारी मारहाण यामुळे शहरात ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (6 जून) सकल हिंदू समाजाचा भगवा मोर्चा काढण्याचा निर्णय हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला होता. मोर्चाच्या अनुषंगाने परवानगीसाठी मोर्चाचे आयोजक आणि प्रशासनामध्ये सातत्याने बैठका सुरू होत्या.
पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी रविवारी अद्याप पर्यंत प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिली नसल्याची तसेच यासंबंधीच्या तयारीच्या आढाव्यानंतर ऐनवेळी ती दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. अखेरीस सोमवारी प्रशासनाकडून मोर्चाला परवानगी देण्याचे निश्चित झाल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आयोजकांना मोर्चाच्या परवानगीचे पत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतेकांना प्रशासनाने 149 च्या नोटिसा बजावल्या आहेत.
मोर्चादरम्यान संगमनेर अकोले तालुक्यातील बहुतांशी गावे देखील स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली जाणार आहेत. तर विविध संघटनांनी देखील आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. मोर्चा सकाळी संगमनेर नगरपरिषदेसमोरील पटांगणातून निघणार असून बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेनरोड, चावडी, अशोक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व तेथून बस स्थानक या मार्गाने प्रांताधिकारी कार्यालयावर येणार आहे. सोमवारी सायंकाळी पोलीस पथकाने याच मार्गाने संचलन केले आहे.
संचलनाचा बघा व्हिडिओ…
त्यामुळे मोर्चापूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त संगमनेरात तैनात केल्याचे दिसून आले. स्थानिक पोलिसांसह एसआरपी, दंगल नियंत्रण पथक, आसपासचे पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी आदींसह मोठ्या प्रमाणात अधिकारी देखील या मोर्चावर लक्ष ठेवून असतील. श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यादेखील संगमनेरात दाखल झाल्या असून त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन सज्ज आहे. आंदोलकांना प्रक्षोभक भाषणांवर बंदी घालण्यात आली आहे.

