महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पवित्र मतदानाच्या माध्यमातून जनतेने लोकशाही मार्गाने आपले प्रतिनिधी निवडले, परंतु याच लोकप्रतिनिधींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी खोके सरकारने नवनवीन कायद्यांची खोडसाळ ढाल पुढे केली आहे. ही सरळसरळ लोकशाहीची क्रूर हत्या असल्याचा घणाघाती आरोप आता राज्यभरातून होत असून, संगमनेरमध्ये याविरोधात संतापाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघावर शासननियुक्त सदस्य ठोकण्याच्या या हुकूमशाही निर्णयाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये ‘राहुल गांधी समर्थक संघ’ (RGSS) आक्रमक झाला आहे. शहरातील ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या रोखठोक फ्लेक्समुळे सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही कारभाराविरोधात संपूर्ण नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘गोकुळ’ दूध संघात सभासदांनी परिवर्तनाचा कौल देत माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला २५ पैकी १३ जागांवर स्पष्ट आणि दणदणीत बहुमत मिळवून दिले होते. मात्र, पराभवाच्या छायेत असलेल्या आपल्या मर्जीतील लोकांना मागील दाराने सत्तेचा उपभोग घेता यावा, यासाठी घाणेरडे राजकारण करत पाच नवे संचालक सरकारमार्फत ठोकून देण्याचा अजब आणि बेकायदेशीर घाट घालण्यात आला आहे. या हुकूमशाही कारभाराविरुद्ध संपूर्ण कोल्हापुरात संतापाची लाट पसरली असून, ९ नोव्हेंबर रोजी उगारल्या जाणाऱ्या जनआंदोलनाचे लोळ आता थेट संगमनेरच्या भूमीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.
‘मत जनतेचे, प्रतिनिधी जनतेचे, मग निर्णय सरकारच्या मर्जीने का?’ असा रोखठोक सवाल उपस्थित करत संगमनेरमधील ‘राहुल गांधी समर्थक संघ’ या संघटनेने सतेज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत या जनआंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. आज गोकुळसारख्या बलाढ्य सहकार संस्थेचा गळा घोटला जात आहे, उद्या राज्यातील इतर सहकार संस्थांवरही सरकार असाच प्रकार घडेल, असा इशारा देत आरजीएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी आणि भाजप प्रवृत्तीवर कडाडून प्रहार केला आहे.
कायदे बदलून ५ नवे शासननियुक्त सदस्य नेमण्याचा अट्टाहास म्हणजे केवळ सत्तापिपासा असल्याचे सांगत, ‘काहीही करा पण सत्ता मिळवा’ या लाचारीने पेटलेल्या राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेचा भस्म्या झाल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला. लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या या ‘शासन निर्णया’चा संगमनेरमधून तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून, संगमनेरकर आता कोल्हापूरकरांच्या या लढ्यात खांद्याला खांदा लावून पूर्ण ताकदीने उतरले आहेत.
संगमनेरात चर्चेत आलेल्या या ऐतिहासिक आणि लक्षवेधी फ्लेक्सवर राहुल गांधी समर्थक संघाचे प्रवीण हासे, सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रतीक कोकणे, सचिन वाळे, राम अरगडे, अजय चव्हाण, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, मोहसीन शेख आणि अमोल शेलकर आदी समन्वयकांची नावे ठळकपणे झळकत आहेत. या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.