महाराष्ट्र संवाद न्यूज
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-२, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे आता लवकरच 2024 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या २०२२ साली आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. आनंद दिघे यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे या सिनेमात पाहायला मिळाले. त्यानंतर धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. 
आता या चित्रपटाचा पुढील भाग येत असून मुहूर्तसोहळ्याच्या वेळी आनंद दिघे यांच्या तसबिरीला वंदन करण्यात आलं आणि अंबेमातेची आरती करण्यात आली. यावेळेस अभिनेता प्रसाद ओक, सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रार्थना करुन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली.
ठाण्याच्या कोलशेत भागात आनंदाश्रमचा सेट उभारला आहे. तसेच कल्पतरु बिल्डरच्या जागेवरही या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये धर्मवीर २ या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे.
पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

