महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ५ डिसेंबर
पोलीस दप्तरी बंद असलेले संगमनेर मधील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अहमदनगर एलसीबीच्या छाप्यात समोर आले आहे. अनेक प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या संगमनेर पोलिसांच्या हद्दीत थेट एलसीबी छापेमारी करत कारवाया करत आहे. यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे पडत असले तरी एलसीबीच्या कारवाया देखील अनेकदा संशयाच्या वलयात अडकलेल्या दिसतात.
बुधवारी सकाळी साडेसात वाजता मोगलपुऱ्यातील बेकायदेशीर कत्तल खानावर अहमदनगर एलसीबी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत एक लाख वीस हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले सहाशे किलो गोमांस ताब्यात घेतले. याशिवाय कत्तरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
अहमदनगर एलसीबीचे पोलीस नाईक सचिन दत्तात्रय अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२९, २६९, ३४ महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले असले तरी सहा आरोपी मात्र फरार झाले आहेत.
शफिक महंमद कुरेशी (वय ३२ वर्षे, रा. गल्ली नं. ९ जमजम कॉलनी संगमनेर), शेहबाज गुलफाम कुरेशी (वय ३२ वर्षे, रा. मोगलपुरा, संगमनेर), मुजाहिद उर्फ मुज्जु दौला कुरेशी (फरार), हारुन सुलतान कुरेशी (फरार), कलीम जलील कुरेशी, (फरार), शाहीद इर्शाद कुरेशी (फरार), उमर शकुर कुरेशी (फरार) व खलील बुढन कुरेशी (फरार) सर्व रा. मोगलपुरा, संगमनेर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे करीत आहे.

