महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कुद्रेमानी (बेळगाव) येथे होणाऱ्या कर्नाटक महाराष्ट्र १८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूरमधील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची निवड झाली आहे.
२१ जानेवारीला हे संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कवी बाबासाहेब सौदागर यांनी शंभरपेक्षा जास्त चित्रपटात, २७ मालिकांमध्ये गीत लेखन केलेले आहे. त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २२ चित्रपटात त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले आहे.

सध्या त्यांचा ‘माझ्या गाण्याची जन्मकथा’ कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला आहे. त्यानी गीतलेखन केलेल्या सत्ताधीश, झुंजार, झुंज एकाकी, राजमाता जिजाऊ, मी सिंधुताई सपकाळ, लग्नाची वरात लंडनच्या घरात, जुगाड,तुझा दुरावा, घुंगराच्या नादात, मध्यम वर्ग, शिवा इत्यादी चित्रपटातील अनेक गीते लोकप्रिय झालेली आहेत.
स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, आशा अभिलाषा या मालिकेतील गीते लोकप्रिय झालेली आहेत. त्यांच्या अनेक लावण्या आणि देशभक्तीपर गाणी लोकप्रिय झाली आहेत.

त्यांनी लेखन केलेलं ‘पायपोळ’ हे मराठा समाजातील पहिले वास्तववादी चित्रण असलेले आत्मचरित्र प्रकाशित झालेले असुन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सांजगंध, पिवळण, चित्ररंग हे कविता संग्रह आणि भंडारभुल हे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे.
त्यांना चित्रपट क्षेत्रातील कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकर पुरस्कार, कवीवर्य जगदीश खेबुडकर जीवन गौरव पुरस्कार, कवीवर्य राम उगावकर पुरस्कार हे सन्मान मिळालेले आहेत. भंडारभुल ही कादंबरी विद्यापीठ अभ्यासक्रमात होती. आकाशवाणी, दुरदर्शनकरीता त्यांनी अनेक गितांचे लेखन केले. आमचा नेता पावरफुल, स्पर्श झाला काळजाला, यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तु, एन्जॉय करु मस्त एन्जॉय करु, ही त्यांची गाणी जन माणसात अतिशय लोकप्रिय झाली. आशा भोसले, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, वैशाली माडे, साधना सरगम, सुरेश वाडकर, रविंद्र साठे, चंद्रशेखर गाडगीळ, कैलाश खेर, शंकर महादेवन, शान, रुपकुंवर राठोड या गायक-गायिकांनी त्यांची गाणी गायली आहेत.
मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन, शब्दगंधचे पहिले साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी यापुर्वी भुषविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत बलभीम साहित्य संघ, बेळगाव यांनी कुद्रेमानी येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल साहित्य आणि राजकीय क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

