मुंबई, दि. २३
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी (वय ८७ वर्ष) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. जोशी यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती. तत्कालीन युती सरकारचे ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या विकासासाठी विविध योजनांची सुरुवात झाली.
शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या अतिशय विश्वासातील असलेले जोशी यांचा नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष असा मोठा राजकीय प्रवास राहिला. तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये देखील अवजड आणि सार्वजनिक उद्योग खात्याचे ते मंत्री होते.
गेल्या काही महिन्यांपासून जोशी प्रकृतीच्या कारणास्तव व वयोमानानुसार सक्रिय राजकारणापासून दूर होते. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर देखील ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले होते. शिवसेना स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी १९६७ मध्ये शिवसेनेत आले होते. जोशी यांना ठाकरे कुटुंबियांच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याचे भाग्य लाभलं. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सोबत त्यांनी काम पाहिले.
दुपारी दोन नंतर त्यांच्या माटुंगा पश्चिम येथील रूपारेल कॉलेज जवळील निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरू होईल. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त केल जात आहे.


