
शुक्रवार दि. ५ एप्रिल
आदिवासी कुटुंबातील १ वर्षाच्या चिमुरडीचे झोपेत झोळीतून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अहमदनगरच्या अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी सुनील मेंगाळ असे अपहरण झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. आदिवासी समाजातील शेतमजूर असलेले सुनील मेंगाळ हे आपल्या कुटुंबीयांसह बेलापूर (ता. अकोले) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाजवळ वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण उरकल्यानंतर त्यांच्या पत्नीने चिमुरड्या वैष्णवीस दूध पाजल्यानंतर घरात बांधलेल्या झोळीत तिला झोपविले होते. त्यानंतर मेंगाळ दांपत्यही झोपी गेले.
मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या सुनील मेंगाळ यांना झोळीमध्ये वैष्णवी झोपलेली असल्याचे दिसून आले. तर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वैष्णवीला दूध पाजण्यासाठी उठलेल्या त्यांच्या पत्नीस चिमुरडी वैष्णवी झोळीत नसल्याचे आढळून आल्याने धक्का बसला.
अज्ञात व्यक्तीने झोपेतच तिचे झोळीतून अपहरण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोले पोलीस पुढील तपास करत आहे.

