महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बाबूजी (प्रेमानंद रुपवते) हे अखिल महाराष्ट्रातील चळवळींत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान राहिले असून प्रवर्तनाय साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक दूरदृष्टीची मांडणी केली. मुंबईतील चेतना महाविद्यालयात झालेल्या नवीन शैक्षणिक धोरण १९८६ विषयीच्या परिषदेद्वारे त्यांनी नव्या शैक्षणिक प्रवाहाची कार्यकर्त्यांमध्ये समज निर्माण केल्याचे नमूद करत, आज अशा प्रेरणा देणाऱ्या नेत्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ञ, विचारवंत अरविंद वैद्य यांनी केले प्रतिपादन केले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बहुजन शिक्षण संघाच्यावतीने जनसामान्यांचे नेते बाबूजी उर्फ प्रेमानंद रुपवते यांच्या ८० व्या जन्मदिवसानिमित्त एका भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास सुशिलाबाई दादासाहेब रूपवते, नाट्य लेखक डॉ. सोमनाथ मुटकुळे, उत्कर्षा रूपवते आदी उपस्थित होते.
अरविंद वैद्य यांनी आपल्या मनोगतात डाव्या चळवळीत असूनही बाबूजींशी जुळलेली घट्ट मैत्री आणि काँग्रेस पक्षातल्या लोकांशी झालेला संपर्क यावर प्रकाश टाकला. बाबूजींशी मैत्री झाल्यावर आपण एकत्रितपणाने चळवळीत खांद्याला खांदा लावून काम केले. बाबूजींमुळे काँग्रेस पक्षातल्या अनेक लोकांशी आपली मैत्री झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली. अनेक आंदोलनांमध्ये बाबूजींबरोबर एकत्र काम करताना त्यांच्यातल्या माणुसकी, शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करणे, सामाजिक प्रश्न तडीस नेण्याच्या तळमळीचे दर्शन आपल्याला झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रूपवते यांनी प्रास्ताविक करताना बाबूजींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. एक नेता, कुटुंबप्रमुख आणि साहित्य व संगीताचे रसिक म्हणून त्यांनी अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या असून आजच्या जेन झी पिढीला समर्थन आणि मार्गदर्शन करण्याची पात्रता असणारे ते एकमेव नेते असल्याचे सांगितले.
बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते यांनी, निवडणुकांत अपयश येऊनही प्रचारात किंवा सामाजिक प्रश्न सोडवताना बाबूजींचे हास्य कधीही मावळले नसल्याचे सांगत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत मैत्रीच्या आठवणी उपस्थितांसमोर उलगडल्या. त्यांची अस्खलित मराठी आणि हिंदी-उर्दू शब्दांचा भरणा असलेली भाषणे काळसुसंगत व भविष्याचा वेध घेणारी राहिली असल्याचे ते म्हणाले.
अभिवादन सभेनंतर संगमनेर येथील डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित आणि दिग्दर्शित ‘पुन्हा क्रांतीज्योती’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे प्रभावी सादरीकरण झाले. यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनसंघर्ष, महात्मा ज्योतिराव फुले यांची लाभलेली भक्कम साथ आणि त्याकाळात सोसाव्या लागलेल्या त्रासाचे प्रसंग अत्यंत परिणामकारक पद्धतीने रंगमंचावर मांडण्यात आले.
यावेळी वसंतराव बैचे, कुसुम बाळसराफ, मिलिंद गायकवाड, डॉ. गोविंद कोळगे, सूर्यकांत शिंदे, वैभव वारे, सुनील जाधव, सुरेश जगधने, सुवर्णा भुजबळ, प्रवीण रुपवते, शाहीर संदेश उमप, सुधीर वाघमारे, रघुनाथ जगताप, विकास जगताप, उल्हास घोडे, विकास वनपत्रे, प्राचार्य सूर्यवंशी, धम्मयात्रा कमिटी मुंबई आणि ग्रामीणचे पदाधिकारी-कार्यकर्ते, बहुजन शिक्षण संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रमास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश पारखे यांनी मानले.