भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो. 9822733708)
संगमनेर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर वसलेले राजापूर हे गाव आज तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे. म्हाळुंगी नदीच्या तीरावर वसलेल्या या सात ते आठ हजार लोकसंख्येच्या गावाने आपला ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक विकासाची कास धरली आहे. क्रांतीचा इतिहास जपणारे गाव-
राजापूरचा इतिहास हा केवळ भूगोलापुरता मर्यादित नाही. स्वातंत्र्यानंतर १९५० साली तत्कालीन सरकारने दुष्काळातही शेतकऱ्यांवर सक्तीची धान्य लेव्ही लादली होती. याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वाखाली कॉ. सहाणे मास्तर, कॉ. रामभाऊ नागरे, कॉ. विष्णु हासे आणि कॉ. दगडू हासे यांनी येथे शेतकरी आंदोलन उभारले.
९ मार्च १९५० रोजी या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कॉ. मारुती गायकवाड, कॉ. काशिनाथ कदम आणि कॉ. मुरलीधर गोळेकर या तीन शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारलेले हुतात्मा स्मारक आज देशपातळीवर प्रेरणास्थान ठरले आहे. दरवर्षी ९ मार्च रोजी येथे हुतात्मा दिन साजरा केला जातो. तालुक्याला आदर्श ठरलेली एकीची संस्कृती-
राजापूरचे आजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील व्यावसायिक एकी. गावात जवळपास २५ ठिकाणी अशी कुटुंबे आहेत, जिथे सख्खे दोन भाऊ शेजारी-शेजारी बसून एकच व्यवसाय आनंदाने करतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू होणाऱ्या या व्यवसायांमध्ये रिक्षा, टेलरिंग, किराणा, भेळ, सलून, इलेक्ट्रिक, बिल्डिंग मटेरियल, फॅब्रिकेशन अशा सर्व व्यवसायांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे भालेकर,जाधव, हासे, खतोडे, घोलप, सोनवणे, आव्हाड, पठाण यांसारख्या विविध आडनावाच्या कुटुंबात ही परंपरा दिसून येते. स्पर्धा न करता सहकार्याने व्यवसाय करण्याचे हे मॉडेल आज तालुक्यासाठी अभ्यासाचा विषय बनले आहे. विकासाचे मॉडेल-
जातीपातीच्या राजकारणाला थारा न देणे हाच या गावाच्या विकासाचा मूलमंत्र आहे. स्थानिक निवडणुकीत सत्ता परिवर्तन होत असले तरी विकास कामांवर त्याचा परिणाम होत नाही.
निसर्गानेही या गावाला भरभरून दिले आहे. एका बाजूला आढळा तर दुसऱ्या बाजूला म्हाळुंगी नदी वाहते. नदीवर दोन दगडी बंधारे असून अडीच एकराचे विशाल तळे प्रवरा नदीच्या पाण्याने भरले जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. येथे डाळिंबासह फ्लॉवर, बीट, वांगी, कांदा, ऊस, मका यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुविधांनी परिपूर्ण गाव-
ग्रामपंचायतीची स्वतःच्या मालकीची भव्य इमारत, संपूर्ण गावात सीसीटीव्ही, ११ केव्ही सबस्टेशन, कचरा, एरो प्लेट, व्यवस्थापनासाठी घंटागाडी व कंपोस्ट प्रकल्प, ५-६ दूध संकलन केंद्रे, ५ कृषी सेवा केंद्रे, अत्याधुनिक वेअर हाऊस, हासे बंधूंची उच्च दर्जाची रोपवाटिका, राष्ट्रकूट व जिल्हा बँक, ५ पतसंस्था, हॉस्पिटल, दवाखाने, मेडिकल, पोस्ट ऑफिस, भाजीपाला मॉल आणि जिल्हा परिषद शाळा ते सिनिअर कॉलेजपर्यंत शिक्षणाची सोय या गावात आहे. गावात दोन लाखांपासून ते पाच कोटींपर्यंतची पक्की घरे या गावाच्या सुबत्तेची साक्ष देतात.
गावात दरवर्षी श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थानची भव्य यात्रा भरते. तसंच सात दिवशीय हरिनाम सप्ताह गावात असतो,तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, आरोग्य सेवक, आशा सेविका, तंटामुक्ती समिती, वृक्षारोपण समिती आणि तरुण मित्र मंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नातून गावाचा विकास होत आहे. गावातील अनेक तरुण सैन्यदलात व पोलीस दलात देशसेवा बजावत आहेत.