
मंगळवार दिनांक ४ जून
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी ५० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांना विजयी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा मूळ शिवसेनेची (ठाकरे गट) मशाल पेटली आहे.
नवे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विषयी मतदारांमध्ये फारशी सहानुभूती नसली तरी राज्यात घडलेले फोडाफोडीचे राजकारण शिर्डीतील मतदारांना मानवले नाही. अनेक पक्ष बदलून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेल्या वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विद्यमान खासदाराविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा वाकचौरे यांना झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी वाकचौरे यांच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून आले. निवडणूक निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.





