बुधवार, दि. १२ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याच्या कारणावरून प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांच्या निलंबनाला काही तास उलटत नाही तोच आता विधान परिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

पक्ष विरोधी काम करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांवर निलंबनाची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून कारवाई सत्र सुरू झाले आहे.
गावंडे पाठोपाठ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे.


