रविवार, ३० जून
दिवसरात्र राबूनही मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च झेपत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या अभागी पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगोला शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
हरिश्चंद्र सुभाष दौंडे (वय ५२) असे आत्महत्याग्रस्त पित्याचे नाव आहे. या संदर्भात त्यांचे नातेवाईक महेश दत्तात्रेय बोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
मृत हरिश्चंद्र यांचा मुलगा ज्ञानमूर्ती हा बारामती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस, तर मुलगी संज्योत पुण्यात विधी पदवीचे (एलएलबी) शिक्षण घेत आहे. हरिश्चंद्र हे एका बँकेत शिपाई पदावर सेवेत होते. दिवसा बँकेत आणि रात्री एका पेट्रोल पंपावर रखवालदाराची नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च भागविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करूनही त्यांना आर्थिक विवंचना सतावत होती. यातूनच त्यांची अस्वस्थता वाढली होती. गेल्या १५ दिवसांपासून ते खूप तणावाखाली होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.
दरम्यान, रात्री पत्नी मनीषा सांगोला शहरात कोष्टी गल्लीत माहेरी गेल्या असता हरिश्चंद्र यांनी घरात छताच्या पंख्याला सुताच्या दोरीने गळफास लावून घेतला. पत्नी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.


