रविवार, २८ जुलै
मुंबई – नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज रविवारी (२८ जुलै) विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.
नवनिर्वाचित सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दोन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराचा समावेश आहे.
निवडून आलेल्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा शपथ घेणाऱ्या सदस्यात समावेश आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये शपथ दिली. यावेळी गोऱ्हे यांनी सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.


