सोमवार, २९ जुलै – प्रतिनिधी
घराबाहेर खेळणाऱ्या पाच-सहा लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहे.
संगमनेर शहरात दहशत निर्माण केलेल्या मोकाट कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री नाशिक-पुणे महामार्गालगतच्या मोगलपुरा (राजवाडा) भागात घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पाच ते आठ वर्षे वयोगटातील पाच सहा लहान मुले गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात पाच-सहा लहान बालके गंभीर जखमी झाल्याचे वृत्त महाराष्ट्र संवाद न्यूजने आपल्या वेब पोर्टलवर शनिवारी सकाळी प्रसिद्ध केले होते. शनिवारी आठवडे बाजारचा दिवस असल्याने मोकाट कुत्रे पकडण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो, त्याचा नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेत संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी रविवारी सकाळीच आपल्या कर्मचाऱ्यांना मोकाट कुत्रे पकडण्यासाठीची मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी मोगलपुरासह काही भागात मोकाट कुत्र्यांची शोध मोहीम राबवत त्यांची धरपकड केली. पथकाने जवळपास दोन डझनहून अधिक मोकाट कुत्रे पकडले आहे. शहराच्या अनेक भागात या मोकाट कुत्र्यांचा उपद्रव जाणवत आहे. पालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले आहे.


