बुधवार, ३१ जुलै
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून यामुळे धरणात पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा ९१ टक्केपर्यंत गेल्याने धरणातून प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. बुधवारपासून धरणात एक हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे.
त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे धरणापर्यंतच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक देखील सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन कक्षाला कळविण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ९०.९२% तर निळवंडे धरणातील पाणीसाठा ५२.६३% इतका झाला होता. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे.

