मंगळवार, १३ ऑगस्ट
आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. यातच अध्यक्षपदी पक्षातील एखाद्या महिलेची वर्णी लावावी असा पक्षांतर्गत सूर उमटला आहे. त्यामुळे भाजपच्या पुढील अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पाच तास बैठक झाली. यावेळी भाजपचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची चाचपणी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, राजनाथ सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आरएसएस सदस्य दत्तात्रय होसबले आणि सह सरचिटणीस अरुण कुमार बैठकीत उपस्थित होते.
बैठकीत आरएसएस आणि भाजप या संबंधात देखील चर्चा झाल्याची माहिती असून अन्य महत्त्वाच्या विषयावर देखील चर्चा झाली आहे. आतापर्यंत भाजपच्या अध्यक्षपदावर एकदाही महिलेची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती केली तर हे मोठं पाऊल मानलं जाऊ शकतं. या निवडीचा परिणाम आगामी निवडणुकीत जनतेवर होऊ शकतो, असं देखील मानलं जात आहे.


