महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले तालुक्यातून एक खळबजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील वाशेरे शिवारात एका शेतकऱ्याने दोडक्याच्या पिकाआड लपून बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. अकोले पोलिसांनी या शेतात धाड टाकून तब्बल १५ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर पावले उचलण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.
वाशेरे शिवारात राहणारा विजय रघुनाथ गजे याने आपल्या शेतात दोडक्याच्या पिकाच्या आड गांजाची झाडे लावली असून त्यांची जोपासना केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करून पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या पथकाने तात्काळ संबंधित शेतात छापा टाकला. या कारवाईदरम्यान दोडक्याच्या पिकात लपवून ठेवलेली सुमारे १५ किलो ३६० ग्रॅम वजनाची ओली व सुकी गांजाची झाडे आढळून आली. बाजारभावानुसार या गांजाची अंदाजे किंमत १५ लाख ३६ हजार रुपये इतकी आहे.
याप्रकरणी आरोपी विजय रघुनाथ गजे (रा. वाशेरे, ता. अकोले) याच्या विरोधात अकोले पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (ब), २० (अ), आणि २० (ब) (१) नुसार गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. दरम्यान, जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अशीच कडक कारवाई करत राहणार असून, नागरिकांनी देखील अशा बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव सक्तीने गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.