विशेष प्रतिनिधी / मुंबई
लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारासाठी केलेलं यशस्वी नेतृत्व पाहता आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर प्रचाराची जबाबदारी देण्याचा विचार महाविकास आघाडीत सुरू आहे. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडेच महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सोपवण्याकडे कल दिसून आला.
विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्याने महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात पुन्हा एकदा जोरदार प्रचार सुरू करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही आपली आढावा बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळं त्यांच्या हाती पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचं काम सोपवण्याचं जवळपास निश्चित केलंय.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात असलेली प्रतिमा आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनीच महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख म्हणून काम करावं, अशा पद्धतीची चर्चा झाली आहे. मात्र, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. काँग्रेसच्या हायकमांडसोबत या संदर्भात चर्चा करून लवकरच एकत्रित निर्णय घेतला जाईल, असंही लोंढे यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सध्या कोणालाही समोर आणलं जाणार नाही. निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले आमदार आपला नेता निवडतील. याबाबत आत्ताच चर्चा करण्याची गरज नाही. तसंच महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करून तो बैठकीत मांडणार आहेत. या जाहिरनाम्याला महाविकास आघाडीकडून जनतेसमोर अधिकृतरित्या मांडलं जाईल, असंही लोंढे यांनी सांगितलं.



