★ आठवडाभरात अत्याचाराच्या अनेक घटना
★ राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत
★ कायदा व सुव्यवस्था ढासळली
★ बदलापूर प्रकरणात मंत्रालयातून दबाव होता काय?
★ संस्थाचालकांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला
★ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन तर दुसरीकडे त्यांचे रक्षण करण्यास सरकार अपयशी
★ मंत्रालय टक्केवारीत गुंतले
★ राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप चुकीचे

शनिवार, २४ ऑगस्ट
गेल्या आठवडाभरात महिला, मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. प्रशासनाचा धाक राहिला नसून या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे. महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
शनिवारी महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आमदार थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळीपट्टी बांधत हातात काळे झेंडे घेत मौन जन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, नरेश माळवे, शहर प्रमुख आप्पा केसेकर, ॲड. दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकर, किरण घोटेकर आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरद पवार गट, आरपीआय व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सुमारे दोन तास सुरू असलेल्या मौन जन आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले, बदलापूरची घटना अत्यंत लांचनास्पद आहे. या घटनेतील गुन्हेगाराची पार्श्वभूमीही वाईट होती. संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांची साथ मिळाली. मंत्रालयामधून दबाव होता की काय, असे महाराष्ट्राला वाटत आहे.
लाडकी बहीण योजना सर्वत्र सुरू आहे. मंत्रिमंडळ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन करत आहे. मात्र या बहिणीचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात बालिका व महिला असुरक्षित असून बेकायदेशीररित्या गठीत झालेले हे खोके सरकार सत्तेवर राहण्याच्या लायक नाही.
मागील आठ दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या खूप घटना घडल्या आहेत. प्रशासनाचा धाक राहिला नाही. मंत्रालयात सर्व टक्केवारीत गुंतले आहेत. गुन्हेगारांवर धाक राहिला नाही. महिलांची अब्रू सुरक्षित नाही. बदलापूरमध्ये जनता एकत्र येऊन निदर्शने करत होती. सत्ताधारी मात्र त्याला राजकीय हेतू म्हणतात ही चूक आहे. न्यायालयाचा मान राखत आम्ही मूक आंदोलन केले यालाही आता राजकीय हेतू म्हटला जात आहे, खरे तर हे सरकारच दुर्दैवी राजकारण करत आहे.
आपण चाळीस वर्षे राज्याच्या राजकारणात आहोत. मात्र इतके वाईट राजकारण कधीही पाहिले नाही. खोके आणि दहशतीमुळे चुकीच्या पद्धतीने हे सरकार सत्तेवर आले होते. जनतेमध्ये या सरकारविरुद्ध मोठा रोष आहे. महाविकास आघाडीला सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करणे अत्यंत चुकीचे व बालिशपणाचे आहे. पवार साहेब एक मोठी शक्ती असून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान आहे. खोके आणि फोडाफोडीतून अनेक जण त्यांना सोडून गेले. मात्र त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत पुन्हा पक्ष उभा केला आहे.


