मंगळवार, २७ ऑगस्ट
पुणे : धडापासून हातपाय वेगळे केलेल्या आणि शिरच्छेद झालेला अवस्थेत पुण्याच्या खराडी भागात नदीपात्रात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. १८ ते २० या वयोगटातील असलेल्या या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तरुणीची ओळख पटविण्याचे आणि आरोपीचा शोध घेण्याचे काम चंदननगर पोलिसांनी सुरू केले आहे.
खराडी परिसरात जेनी लाइट कन्स्ट्रक्शनकडून इमारतीचे काम सुरू आहे. नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचे बांधकाम मजुरांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचं दिसून आलं.
तरुणीची ओळख पटू नये म्हणून शिर धडावेगळे करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेहाला हात, पाय नव्हते. तसेच शीर देखील धडावेगळं करण्यात आलेलं होतं. पोलिसांना फक्त तरुणीचे धड सापडले असून मृतदेहाची ओळख पटवणे सुरु आहे. अज्ञात व्यक्तीने तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलंय. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


