शुक्रवार, २५ ऑक्टोंबर
संगमनेर – बाहेरचे लोक तालुक्यात येऊन हावभाव करत भाषणे करत आहे. त्यांच्यासारखी भाषणे ही आपली संस्कृती नाही, ते घाबरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी जशी शांत, संयमी बाळासाहेब थोरातांची कन्या आहे, तशीच भाऊसाहेब थोरातांची नात देखील आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, अशा थेट शब्दात काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांना उत्तर दिले आहे.
जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली युवा संवाद यात्रा गुरुवारी रात्री संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आली होती. घुलेवाडी येथील यात्रेत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात देखील सहभागी झाले होते.
डॉ. थोरात म्हणाल्या, विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब थोरात यांनी अगदी कुटुंबाप्रमाणे सांभाळला आहे. येथील राजकारणाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला.
तुम्हाला बोलायचेच असेल तर शिस्तीत बोला. मी सुद्धा चांगली खणकावून बोलू शकते. मात्र येथील संस्कृती वेगळी आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी चांगल्या पगारावर नोकरीला होते. परंतु समाजकारणाचे संस्कार आपल्यावर असल्याने गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मी काम करत आहे.
येथील जनतेने खूप चांगले प्रेम आपल्याला दिले. साकुरच्या सभेत केवळ माझ्यावर वीस ते पंचवीस मिनिटे भाषण केल्याने माझी उंची वाढली आहे. दररोज माझे नव्याने नामकरण केले जात आहे. माझा कोणीतरी राजकन्या असा उल्लेख केला. मात्र त्यांचा अभ्यास अत्यंत कमी आहे. या तालुक्यातील मायबाप जनतेला विचारा मी त्यांच्या परिवारातील कन्या आहे, हे अभिमानाने सांगते.

