सोमवार २५ नोव्हेंबर
राज्यात निवडणूक निकाल जाहीर झाल्या असून या निकालांमध्ये राज्यातील अनेक दिग्गजांना विशेषतः महाआघाडीतील प्रमुख नेत्यांना पराभवाचा धक्का पत्करावा लागला आहे. अशातच आता काँग्रेसवर सत्ताधारी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
काँग्रेस नेत्यांवर निशाणा – माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पराभूत झालेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. “ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले. लातूरला एक पडला आणि दुसरा निसटता निसटता निघाला”, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी अमित देशमुख, धीरज देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यावर टीका केली. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशोक चव्हाण म्हणाले – “लातूरला एक पडला आणि दुसरा निसटता निसटता निघाला आहे आणि हे महाराष्ट्राचं नेतृ्त्व करणार? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माझ्यावर टीका करून गेले. भोकर, नांदेडकडे खूप लक्ष देत होते. पण ते निवडणुकीत फक्त १५० मतांनी निवडून आले आणि हे नेते महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? 
त्या पक्षात काय राहिलंय– पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे माजी महसूलमंत्री. हे सगळे काल साफ झाले. सर्वजण निवडणुकीत पडले. ज्यांनी-ज्यांनी मला त्रास दिला ते सर्व साफ झाले. त्यामुळे मला त्रास देऊ नका”, असं अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांचा नाना पटोले आणि अमित देशमुख यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा pic.twitter.com/olqO8Iqvmq
— VIRALबाबा (@viralmedia70) November 24, 2024

