बुधवार, २५ डिसेंबर
संगमनेर – डॉ. जयश्री थोरात यांनी सावरगाव तळ येथील रामनाथ गुरकुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मयत गुरुकुले कुटुंबाच्या पाठीशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सदैव उभे असल्याचे सांगत या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.
चंदनापुरी शिवारात ढग्या डोंगराजवळ वनविभागाच्या मालकीच्या जंगलावर रामनाथ गुरुकुले (वय ३४ वर्ष रा. सावरगाव तळ, संगमनेर) यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याच्या हल्ल्यात यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
थोरात म्हणाल्या, बिबट्यांचे मानवी वस्तीतील हल्ले दिवसेंदिवस वाढले आहे. यामुळे या परिसरात भीतीदायक वातावरण आहे. यापूर्वीही तीन मृत्यू या हल्ल्यातून झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सकाळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मोठ्या जनसमुदायासमोर तत्कालीन वनमंत्र्यांनी याबाबत आश्वासित केले होते.
मात्र अजूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा.
मानवी वस्तीत दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ल्यात वाढ होत आहे. बिबट्यांचे मानवावरील वाढते हल्ले चिंताजनक असून यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
गुरुकुले कुटुंबांची आस्थेवाईकपणे विचारपूस करताना त्यांनी घरातील कर्ता पुरुष गेल्याने गुरुकुले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे सांगीतले. बाळासाहेब थोरात तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात कुटुंब प्रमुख म्हणून सदैव पाठीशी आहेत. त्यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळून दिली जाईल, यासाठी आपण स्वतः काम करू असे त्या म्हणाल्या.


