संगमनेर – संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू तालुक्यातील समनापुर येथील सुरू असलेल्या पोक्सो संदर्भातील विशेष खटल्यात न्यायालयाने ६ महिलांसह ३ पुरुष आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. अवघ्या दोन वर्षात निकाली निघालेल्या या खटल्याकडे लक्ष लागले होते.
समनापुर (संगमनेर) येथे फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीवरून चुलत भाऊ व भावांसोबत न्यायालयात वाद सुरू होते. २ जुलै २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी संगणमताने आलेल्या आरोपींनी फिर्यादीला पाया खोदण्यास मनाई केली. फिर्यादी व तिच्या बहिणींना शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी आरोपीपैकी एकाने जवळच पडलेली व बांधकामासाठी आणलेली वीट उचलून फिर्यादीच्या पाठीत फेकून मारली. तर दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या बहिणीच्या मुलीच्या म्हणजेच पीडितेच्या डोक्यात वीट फेकून मारली तसेच पीडितेला लग्न करत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या व पीडितेच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.
यासंदर्भात ९ जणांविरोधात पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी या संदर्भात न्यायालयात आरोप पत्र दाखल केल्यानंतर या विशेष खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर सुरू होती.
आरोपीच्या वतीने अँड. ऋषिकेश वाणी यांनी काम बघितले. या खटल्यात आरोपींना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यांच्या विरोधात त्रास देण्याचे हेतूने खोटी केस दाखल केली आहे. सदरची घटना घडली याचा कोणताही सबळ पुरावा न्यायालयासमोर आणण्यात आला नाही. पीडित मुलीच्या जन्म नोंदी संबंधी आलेल्या पुराव्यावरून जन्म नोंदी बाबत संशय निर्माण होतो, घटनेबाबाबत सांगणारा एकही स्वतंत्र साक्षीदार नसल्याचा व त्याआधारे जोरदार युक्तिवाद आरोपीचे वकील वाणी यांनी न्यायालयासमोर केला.
सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भाऊबंदकी व राहत्या जागेच्या वादातून आरोपींना त्रास देण्याचे हेतूने खोटी केस दाखल केल्याचा निष्कर्ष काढला. तसेच समोर आलेल्या पुराव्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत संशय उपस्थित केला. तसेच या विशेष खटल्यातील सर्वच्या सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.