महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
वडगाव पान (संगमनेर) येथील दत्तधाम सरकार आश्रमाचा स्वयंघोषित भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे.
कॅन्सरसह अनेक दुर्धर आजार तात्काळ बरे करण्याचा खोटा दावा केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी गडगेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याला अटक केली होती.
सुरुवातीची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी २७ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत केली आहे. राजेंद्र गडगे याच्यावर आता केवळ फसवणुकीचेच नव्हे, तर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गतही गंभीर गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत. आश्रमात महिलांना ‘पुत्रप्राप्ती’साठी औषधे देऊन यश मिळाल्याचा दावा केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाचा पाठपुरावा करताना ॲड. वर्षा देशपांडे यांनी प्रशासनाला पुराव्यासह कायदेशीर नोटीस बजावली होती आणि पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी घुलेवाडी येथील वैद्यकीय अधीक्षकांची ‘तालुका समुचित प्राधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम ६, २२, २५ आणि २६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. एकापाठोपाठ एक गंभीर गुन्हे दाखल होत असल्याने आरोपी राजेंद्र गडगे याच्यासमोरील कायदेशीर पेच अधिकच वाढला आहे.






