महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनने दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यात महत्त्वाची कारवाई करत जप्त केलेले १८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड फिर्यादीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशानुसार परत केले आहेत.
नोव्हेंबर २०२५ दरम्यान तेजस मारुती परदेशी या संशयिताने फिर्यादी चंद्रशेखर विलास शिंदे यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून तिच्याकडील सोन्याचे विविध दागिने घेतले होते. मात्र, ते दागिने परत न करता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून विश्वासघात केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड जप्त केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.