महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये बॅनरबाजीचा कांगावा करण्यापेक्षा नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. आमदार अमोल खताळ यांच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासशून्य कारभाराचा हिशोब द्यावा, अशा शब्दात शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी करत काँग्रेस पुढाऱ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार खताळ हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले संघर्षशील नेतृत्व असून त्यांना सामान्यांच्या अडचणींची जाणीव आहे. ते संगमनेरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवून केवळ बॅनरबाजीचा मुद्दा उपस्थित करणे म्हणजे जनतेचे लक्ष विकासापासून विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, खताळ यांच्यावर टीका करून आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याचा हा केविलवाना प्रयत्न असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
दुसऱ्यांना सल्ले देणे सोपे असते; मात्र स्वतःच्या राजकीय कारकिर्दीतील कामांचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आली की अनेकांची बोलती बंद होते, हेच आजच्या टीकेतून दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा दिखाऊपणा नसून जनतेप्रती असलेली जबाबदारी आहे. मात्र, काही लोकांनी विकासकामांची माहिती देणे म्हणजे बॅनरबाजी आणि श्रेय घेणे म्हणजे दिखाऊपणा असा नवा राजकीय नियम शोधल्याची टीका त्यांनी केली. विरोधकांनी आमदारांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या मागील राजकीय सत्ताकाळाचा अभ्यास करावा.
अनेक वर्षे सत्तेत असताना शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी नेमके काय केले, किती प्रश्न मार्गी लावले आणि किती प्रलंबित ठेवले, याची उत्तरे जनतेला द्यावीत, असे आव्हान त्यांनी दिले. संगमनेरात सध्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असून बदलत्या राजकीय परिस्थितीचे हेच द्योतक आहे. मात्र, विरोधकांना स्वतःचा राजकीय चश्मा उतरवून पाहण्याची गरज आहे.
विरोधकांनी बॅनर मोजण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या नेत्यांच्या पूर्वीच्या विकासकामांचा हिशोब मांडण्याची हिंमत दाखवावी. बॅनर किती लागले यापेक्षा रस्ते किती झाले आणि सर्वसामान्यांचे प्रश्न किती सुटले यावरूनच खरी ओळख ठरते. विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे आमदार खताळ यांच्या लोकप्रियतेला आणि विकासाच्या घोडदौडीला कोणताही फरक पडणार नाही, कारण संगमनेरची जनता आता केवळ बोलणाऱ्यांना नाही तर काम करणाऱ्यांनाच साथ देणार आहे, असे सांगत विनोद सूर्यवंशी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.